Monday, January 24, 2011

Pandit Bhimsen Joshiस्वरातून भेटला ओंकार! (अल्पचरित्र)




'अमृताचे होडी बुडविले तुम्ही
बुडताना आम्ही धन्य झालो
संपले झालो विश्वाकार
स्वरात ओंकार भेटला गा'

विंदा करंदीकरांनी पंडितजींसाठी केलेली ही कविता. यात म्हटल्याप्रमाणे गेली सहा दशके देशोदेशींच्या मैफलीतून श्रोत्यांना स्वरातून ओंकारस्वरूपाचे दर्शन घडविणारे पं. भीमसेन जोशी म्हणजे भारतीय संगीताची ध्वजा उंचावणारे किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक, "संतवाणी'तून सामान्यांपासून जाणकारांपर्यंत सर्वांना मंत्रमुग्ध करणारे असामान्य कीर्तिवंत कलावंत होत. प्रयत्न, प्रतिभा, परमेश्‍वरी वरदान व प्रचंड जिद्द यांचा संगम असलेल्या पंडितजींच्या जीवनाची व त्यांच्या संगीताची कहाणी अद्‌भुतरम्य आहे.

चार फेब्रुवारी 1922, रथसप्तमीच्या दिवशी धारवाडजवळच्या रोण या छोट्या गावात पंडितजींचा जन्म झाला. शिक्षणतज्ज्ञ, भाषाकोविद, संस्कृतपंडित, वेदांतपारंगत म्हणून पुढे नावलौकिक मिळवलेले पं. गुरुराज भीमाचार्य जोशी हे त्यांचे वडील त्या वेळी साधे शिक्षक होते. आजोबा भीमाचार्य हे तंबोरा सुरेल वाजवीत आणि पुराण सांगत. आई रमाबाई यांच्याकडून गोड आवाजाची देणगी पंडितजींना मिळाली. असाधारण स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती असलेल्या भीमसेनला सुरांची ओढ होती. सातव्या वर्षी या मुलाला संस्कृत स्तोत्रे, संध्या व अमरकोश मुखोद्‌गत होते. आईकडून कानडी भजने कानावर पडत असत, ती त्याला पाठ होत असत. तुंगभद्रेत पोहणारा, मैदानी खेळात पटाईत असलेला व गोड गाणी गाऊन दाखवणारा जोशीमास्तरांचा मुलगा "गदगचा पोरगा' म्हणून सर्वांचा लाडका होता.

गदगच्या चन्नप्पा नावाच्या एका संगीत शिक्षकाने त्याला संगीत शिक्षणाचे धडे दिले. वयाच्या नवव्या वर्षी वडिलांनी पेटी घेऊन दिली. पण या छोट्या शिष्याची असामान्य ग्रहणशक्ती पाहून शिक्षकाने त्याला सुयोग्य गुरू हवा, असे मोकळेपणाने सांगितले.

1932-1935 गाण्यासाठी भ्रमंती
1932 मध्ये गदगला सवाई गंधर्वांची गाण्याची मैफल भीमसेनने ऐकलेली होती. त्यांचे गाणे त्याला फार आवडले होते. भावी काळात त्यांचा तो लाडका शिष्य झाला. गदगच्या पं. नेहरूंच्या सभेत या बालगायकाने "वंदे मातरम्‌' म्हटले होते. पण 1933 मध्ये हॉटेलात लागलेल्या एका ध्वनिमुद्रिकेने त्याच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. किराणा घराण्याचे प्रमुख उस्ताद अब्दुल करीम खॉं साहेबांच्या झिंझोटी रागातल्या "पियाबिन आवत नाही चैन' या ठुमरीने या छोट्या मुलाला अक्षरशः वेड लावले. 1933 च्या ऑगस्ट महिन्यात अवघ्या अकराव्या वर्षी उस्ताद अब्दुल करीम खॉं साहेबांसारखे गाणे यावे म्हणून गुरूच्या शोधात त्याने कोणालाही न सांगता घर सोडले. या मुलाचा विजापूर, पुणे ते ग्वाल्हेर असा प्रवास खडतर होता. रेल्वेत गाणे गाऊन मिळालेल्या पैशात कधी अर्धपोटी, कधी उपाशी अवस्थेत ग्वाल्हेर गाठले. ग्वाल्हेरच्या महाराजांच्या संगीत विद्यालयात शिक्षण घेणाऱ्याला अन्नछत्रात एक वेळ जेवण मोफत मिळे. ग्वाल्हेर गायकीचे मोठे केंद्र तिथे होते. आजचे आघाडीचे सरोदवादक उस्ताद अमजदअली खॉं साहेबांचे वडील उस्ताद हाफिजअली खॉं साहेबांनी त्याची अन्नछत्रात भोजनाची सोय लावून दिली. भीमसेन त्यांच्याकडून "मारवा' राग शिकला, पण उस्तादजींच्या दौऱ्यांमुळे शिक्षणात सातत्य राहिना. राजाभय्या पूँछवाले यांनी खडगपूरच्या केशव मुकुंद लुखे यांच्याकडे जायला सांगितले. तिथे काही काळ राहिल्यानंतर कोलकत्यात त्या वेळचे न्यू थिएटर्सचे चित्रपट गायक नट पहाडी संन्याल यांच्याकडे घरकाम व संगीत शिक्षण सुरू झाले. पण त्यांच्या चित्रीकरणामुळे त्यातही खंड पडू लागला. संन्याल यांनी सांगितल्यानुसार भीमसेन काही काळ विश्‍वदेव चटर्जींकडे राहिले. गांधारी रागातील बंदिश शिकले. चित्रपटात काम करण्याचा संन्याल यांचा सल्ला मान्य न करता भीमसेन अब्दुल करीम खॉं यांची गायकी आत्मसात करण्याच्या ध्यासाने 1934 च्या डिसेंबर महिन्यात जालंधरला दाखल झाले. तिथे ध्रुपदिये मंगतराम यांनी तोडकंमोडकं हिंदी येणाऱ्या, गोड गळ्याच्या या मुलाला आपल्याकडे राहू दिले. हजार जोर काढायचे, दूध, जिलेबी असा खुराक घ्यायचा व गुरुजींकडून गायनशिक्षण घ्यायचे असा क्रम दीड वर्ष चालला.

हरिवल्लभ संगीत संमेलनात विनायकबुवा पटवर्धन यांनी भीमसेनला कुंदगोळला सवाई गंधर्वांकडे गायकी शिकण्याचा सल्ला दिला. तो शिरसावंद्य मानून युवा भीमसेन 1936 च्या जानेवारीत घरी परतले. मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आईवडिलांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. "तुला पुढं शाळेत जायचं नसेल तर हरकत नाही; पण गायनविद्येत मात्र तू पंडित व्हायला पाहिजेस' असे वडिलांनी भीमसेनला सुनावले. पुढे अठरा वर्षानंतर 1954 मध्ये याच गायकाला पुण्यातल्या रामेश्‍वर मंदिराच्या ब्रह्मवृंदाने "पंडित' या उपाधीने गौरविले.

1936-1940 - कुंदगोळला गुरुगृही
हा कालखंड युवा भीमसेनच्या कठोर संगीत साधनेचा होता. कुंदगोळला सवाई गंधर्वांकडे राहून त्यांनी शिकायला सुरवात केली. दौन मैलांवर असलेल्या नदीवरून कावडीने पाणी भरणे, गुरुगृही पडेल ती कामे करणे व गाण्याच्या शिकवणीला बसणे असा दिनक्रम असे. चौदाव्या वर्षी आवाज फुटल्याने थोडी तालीम व अधिक श्रवणभक्ती करावी लागली. गुरुभगिनी गंगूबाई हनगल व गुरुबंधू नाडगीर यांची तालीम व गुरुजींचा रियाज ऐकण्याचा लाभ झाला. तोडी, मुलतानी व पूरिया हे तीनच राग गुरुजींनी सातत्याने तीन वर्ष शिकविले.

सवाई गंधर्व "एचएमव्ही'साठी ध्वनिमुद्रिका तयार करीत होते. "आसावरी', "पूरियाधनाश्री', "तोडी', "भैरवी', "पूरिया', "नटमल्हार' या रागांचा गुरुजींचा सराव ऐकताना त्यांचे वेळेचे अचूक भान व त्यांची स्वयंशिस्त याचा आदर्श वस्तुपाठ भीमसेनना मिळाला. पुढे सहा दिवस मेहनत व सातव्या दिवशी ग्रामस्थांसमोर गाणे होई. त्या वेळी वडील जातीने हजर असत. या कार्यक्रमासाठी हुबळी, धारवाडहून लोक येत. एकदा श्रोते म्हणून मल्लिकार्जुन मन्सूर, सुरेशबाबू माने हजर राहिले होते.

1941-1946 - महाराष्ट्राला ओळख
1941 मध्ये हुबळीच्या रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये गंडाबंधनाचा सोहळा झाला. 1001 रुपयांची गुरुदक्षिणा दिली व त्या दिवशी गुरुभगिनी गंगूबाई हनगल व कृष्णा रामदुर्ग गायल्या. एकोणीस वर्षांचे भीमसेन त्यात होते. भीमसेन गदगबाहेर पडले ते नवनवे गाणे शिकण्याच्या ध्यासानेच. मुंबईत ऐकायला मिळालेल्या बनारस- लखनौच्या उपशास्त्रीय गाण्याच्या ओढीने भीमसेन उत्तर प्रदेशात गेले. रामपूरच्या उस्ताद मुश्‍ताक हुसैनची सहा महिने शागिर्दी केली व रामपूर गायकीचे मर्म आत्मसात केले. कथ्थकचे विख्यात नर्तक शंभू महाराज, बेगम अख्तर, दिनकर कैकिणी; तर बनारसमध्ये बिस्मिल्लाखॉं, सिद्धेश्‍वरी देवी, रसूलनबाई यांच्याशी संगीतमय संवाद साधून जे जे शिकता येईल ते ते भीमसेन शिकले. 1943 मध्ये भीमसेन गृहस्थाश्रमी झाले. सुनंदा कट्टी या सुंदर मुलीशी त्यांचा विवाह झाला. याच वर्षी मुंबई व निजाम रेडिओशी ते करारबद्ध झाले. 1944 मध्ये मुंबईत झालेल्या विक्रमादित्य संगीत समारोहात ते गंगूबाईंसमवेत गेले होते. बडेगुलाम अलीखॉंसाहेब, कुमार गंधर्व, पु. ल. देशपांडे यांच्याशी भीमसेन यांचा परिचय झाला. बडेगुलाम अलींच्या ठुमऱ्यांची त्यांना गोडी लागली. भीमसेननी स्वतःची ठुमरीची शैली विकसित केली. मात्र अजूनही त्यांचा मोठ्या स्वरमंचावर प्रवेश झाला नव्हता. मुंबईच्या भेटीत दोस्ती झालेले समवयस्क कुमार गंधर्व भीमसेनना म्हणाले, "स्टेजवर का गात नाहीस?' त्यावर "आत्मविश्‍वास आल्यावर गाईन' असे उत्तर भीमसेननी दिले होते. कुमार त्यावर म्हणाले, "असे गाता गाताच येतो आत्मविश्‍वास...' आणि तशी संधी लवकरच आली.

19 जानेवारी 1946 या दिवशी पुण्याच्या हिराबागेत सवाई गंधर्वांचा षष्ट्यब्दीपूर्तीचा भव्य सोहळा होता. वक्‍त्यांमध्ये बालगंधर्व, गोविंदराव टेंबे होते. गुरुजींनी भीमसेनना पंचवीस मिनिटे गाण्याची परवानगी दिली. त्यांनी मिया मल्हार रागातील प्रसिद्ध बंदिश "करीम नाम तेरो' विलंबित एकतालात सादर केली. त्यानंतर "महंमदशाह रंगीले' ही चीज द्रुत एकतालात गायली. "चंद्रिका ही जणू' हे नाट्यगीत ऐकवले. सारे जण या तरुण गायकाच्या मैफलीत मंत्रमुग्ध झाले. त्या वेळी उपस्थित असलेले आयुर्वेदाचार्य पाडुरंगशास्त्री उद्‌गारले, "अरे, हा तर मोठ्या गणपतीच्या पोटातून लहान गणपतीच उमटला की!' भीमसेन जोशी यांची महाराष्ट्राला ओळख झाली.

आकाशवाणीवर वीस रुपये मिळत म्हणून ट्रामचे दोन आणे वाचवून पायपीट करणारा, इस्त्री नसलेला शर्ट-पायजमा घालणारा, चुरमुरे खाऊन अर्धपोटी झोपणारा कर्नाटकातून आलेला चोवीस वर्षांचा तरुण सामान्य श्रोत्यांचे, जाणकारांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. सर्व ठिकाणांहून आमंत्रणांचा ओघ सुरू झाला.

1952-58 - "सवाई' ते "हवाई'

वत्सला मुधोळकर या सुंदर, गानविद्यानिपुण युवतीच्या प्रेमात पडून भीमसेननी विवाहबद्ध होण्याचे ठरवले. 20 मे 1951 रोजी नागपूर येथे त्यांचा विवाह झाला. दोन संसारांची जबाबदारी, गावोगावीच्या मैफिली, उत्तरोत्तर विकसित होणारी गायकी, पाठोपाठ मानसन्मान व लोकप्रियता यांनी आगामी काळ बहरला. 12 सप्टेंबर 1952 या दिवशी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांचे निधन झाले. पुढील वर्षी पुण्यतिथीला भीमसेननी एका संगीत समराचे आयोजन केले. उत्तरोत्तर या समारंभाने एक विशाल रूप धारण केले. अनेक नवोदित, उदयोन्मुख व नामवंत कलाकारांचे गायन, वादन, नृत्य यांचे व्यासपीठ असलेला, हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत साजरा होणारा भव्य त्रिरात्र महोत्सव अजूनही दिमाखात सुरू आहे. पंडितजींच्या गायनासाठी शेवटच्या रात्री हजारो श्रोते तिष्ठत वाट पाहत असत. मुख्य आयोजक म्हणून लगबग करणारे, स्टेजवर तंबोरे जुळवून देणारे पं. भीमसेन जोशी श्रोत्यांना पाहायला मिळत असत. 29 नोव्हेंबर 1953 या दिवशी कोलकत्याच्या एन्टाली संगीत संमेलनात पंडितजी गायले आणि बंगवासी रसिकांच्या गळ्यातील ताईत झाले. देशभरात पं. भीमसेन जोशी हे नाव गाजू लागले.


दुचाकीवरील प्रवास संपला आणि 1958 मध्ये पंडितजींनी पहिली गाडी शेवरोलेट घेतली. गाडी चालवणे, तसेच दुरुस्ती व देखभाल करणे त्यांचा छंद होता. दीर्घ पल्ल्याचे भारतभ्रमण केल्यानंतर पंडितजींचे विमानप्रवासाचे पर्व सुरू झाले. पु. ल. देशपांडे यांनी गमतीने त्यांना "हवाईगंधर्व' ही पदवी दिली!

1958-1972 - इंद्रायणी काठी ते संतवाणी
पंडितजींनी 1968 मध्ये गोपाळकृष्ण भोबे यांच्या "धन्य ते गायनी कळा' या नाटकाला संगीत दिले. "इंद्रायणी काठी देवाची आळंदी' हे "गुळाचा गणपती' या चित्रपटातील गीत गायले, तसेच "भैरवी', "पतिव्रता', "स्वयंवर झाले सीतेचे' आदी चित्रपटांतून गाणी गायली. पण "ख्यालगायकी'चा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पं. भीमसेन जोशींनी त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला तो "संतवाणी'ने. संगीतकार राम फाटक यांनी पुणे आकाशवाणी केंद्रावरून सादर होणाऱ्या "स्वरचित्र'मधून संतवाणी पंडितजींकडून गाऊन घेतली. 1968 ते 72 या काळात "तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल', "नामाजा गजर', "अणुरणिया थोकडा', "अधिक देखणे तरी', "ज्ञानियांचा राजा गुरू महाराव', "पुण्य पर उपकार' इ. अभंगांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. प्रत्येक मैफलीत त्यांना संतवाणी गायचा आग्रह होत असे. मराठी भाषा न समजणाऱ्या श्रोतृवर्गातूनही "तीर्थ विठ्ठल'चा आग्रह होत असे. सर्वाधिक खपाच्या ध्वनिमुद्रिकांमध्ये आजही "संतवाणी' आघाडीवर आहे. पंडितजींनी नवरागनिर्मितीही केली. त्यांनी निर्मिलेले "ललत भटियार', "हिन्दोलिता', "कलाश्री' लोकप्रिय आहेत. सामान्य श्रोत्यांपासून राष्ट्रप्रमुख, नेते, अभिनेते, खेळांडूपर्यंत सर्वांना पंडितजींबद्दल कुतूहल असे.

"कलाश्री' बंगल्यासमोर त्यांच्या तीन अत्याधुनिक गाड्या, माणसांची वर्दळ असे. पुरस्कार, मानसन्मान यांचा त्यांच्यावर नेहमी वर्षाव होत असे. पण पायजमा-झब्बा, शाल आणि चपला असा त्यांचा वेश कधीही बदलला नाही. ते फुटबॉल मॅच, क्रिकेटचा सामना याचाही आनंद घेत असत. पंडितजींनी 23 देश व 67 शहरांत मैफली केल्याची नोंद आहे. नृसिंह या कुलदैवतावर आणि राघवेन्द्रस्वामींवर त्यांची अपार श्रद्धा. गुलाम रसूल खॉं साहेबांबरोबर दर्ग्यातही ते जात. 

जेम्स बेवरिज या कॅनडातल्या उद्योगपतीने त्यांच्यावर लघुपट केला, तसेच गुलजार यांनी केलेला लघुपटही प्रसिद्ध आहे. व्यसनाधीनतेवर मात करून त्यांनी गाण्याची व जीवनाची मैफल सुरेल ठेवली, कधी बिघडू दिली नाही. तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या, रोजचा रियाज कधी चुकवला नाही. 4 जून 2005 या दिवशी पत्नी वत्सलाबाईंच्या मृत्यूनंतर व स्वतःच्या नऊ शस्त्रक्रियांनंतर ते काहीसे एकाकी झालेले होते. त्यांच्या सदाबहार मैफलींसाठी ते रसिकांच्या नित्य स्मरणात राहतील.
 
(Excerpts from ESakal)
 
More Links:

No comments:

Post a Comment